सोमवार, ०८ जुलै
आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे
मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य
दादा!
पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिन्याला १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. या बदल्यात तू … गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईतपण तुझी बहीण सुखी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना सांगतील माझा मामा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे मी एवढे मोठे शिक्षण घेतले म्हणून तुझ्या नावाने दिमाखात फिरतील. माझ्या मामानं केल्यान, माझ्या मामानं केल्यान म्हणून तुझ नाव जगभर करतील.
दादा.. आम्हाला दीड हजार रुपये खरंच नको देऊ रे! पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी लागतात तेवढ्याचे तरी काय कमी भाव करता येतात का तर बघ.
तूझी लाडकी बहीण कमळाबाई.



