महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा उदात्त विचार घेऊन काँग्रेसने देश उभारणीचे महान कार्य केले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये काही जातीय शक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असून, अशा धर्मांध शक्तींच्या विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा सुरू असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्री थोरात, ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार, संग्राम खोपडे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, बालाजी गाडे यांच्यासह राज्य युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
युवकांना मार्गदर्शन करताना उल्हासदादा पवार पुढे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्याला स्वातंत्र्यसैनिक आणि प्रगल्भ विचारांच्या नेतृत्वाचा मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या संत विचारांच्या परंपरेवरच काँग्रेसचा पाया रचला गेला असून सर्वांना सोबत घेऊन चालण्याची या पक्षाची संस्कृती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ या एका हाकेवर संपूर्ण देश एकवटला होता. इंदिरा गांधी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व देशाला मिळाले. युनोने महात्मा गांधी यांचा जन्मदिन आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि गांधींवर टीका करणारे आजचे सत्ताधारी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच नावाचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अध्यात्म हे समाजाचे प्रबोधन करण्यासाठी असते, मात्र सध्या काही धर्ममार्तंडांकडून धर्माच्या नावाखाली समाजात दुही निर्माण केली जात आहे. वारकरी संप्रदायात काही ‘बेलगामी’ लोक घुसले असून त्यांनी अंधश्रद्धा वाढवली आहे. अशा काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मानवतावादी विचार सांगावा, असे आवाहन पवार यांनी केले.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उल्हासदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, दादा संत साहित्याचे मोठे अभ्यासक असून काँग्रेसशी अत्यंत एकनिष्ठ आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली विलासराव देशमुख युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दिवंगत विलासरावजींचे दादांवर कायम प्रेम होते, अशा आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
या सोहळ्यात माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनीही आपले विचार मांडले. सध्याच्या इंटरनेटच्या युगात युवकांनी ५० वर्षांपूर्वीचे संगमनेर आणि आजचे समृद्ध, सोयीनीयुक्त संगमनेर यांची तुलना गुगलवर जाऊन करावी. या विकासाच्या सर्व वाटचालीचे श्रेय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाला जाते, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






