महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, सातारा:
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी शिवसेनेत सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमांकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेत भाजपशी युती करून आपली पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी निवडून आणल्यानंतर, आमदार शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभा आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिले. या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधला. आपल्याला या कार्यक्रमाची कोणतीही माहिती किंवा निमंत्रण देण्यात आले नसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
पालकमंत्र्यांकडून सातत्याने डावलले जात असून, पक्षाच्या फलकांवरूनही आपले नाव गायब असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. तसेच आपण मूळचे भाजपचेच असून केवळ मतदारसंघ वाटपामुळे शिवसेनेत आलो होतो, अशी आठवण करून देत त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या ढासळत्या ताकदीला पालकमंत्र्यांची कार्यपद्धती जबाबदार असल्याची टीका केली.
दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शिंदे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेना हा शिस्तीचा पक्ष असून पक्षात आमदारांना निमंत्रण देण्याची कोणतीही पद्धत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित सदस्यांच्या कौतुकासाठी हा सोहळा आयोजित केला होता आणि यातून कोणालाही राजकीय शह देण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे देसाई यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केल्यामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी आता अधिक तीव्र झाली असून, या वादावर वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





