विशेष प्रतिनिधी | मुंबई
गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती तात्काळ भरण्यासाठी निवडणूक घेण्याच्या मागणी करिता राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची मंगळवारी भेट घेतली. विधान परिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधातील वाढत्या तक्रारीची दाखल घेत विधान परिषदेसाठी सभापतींची निवड घेण्यात यावी, या मागणीसाठी ही भेट घेण्यात आली, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
राज्यपालांची भेट घेताना दानवे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, सतेज (बंटी) पाटील, रमेश कोरगांवर, जयंत पाटील हे उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर मविआच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील सभापती पद हे गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड करावी, अशी भूमिका मांडली आहे. सभागृहात सुद्धा याबद्दलची चर्चा झाली. एक संविधानिक पद अडिच वर्ष रिक्त राहाणे, हे कायद्यातही बसत नाही. हे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मिळून राज्यपाल रमेश बैस यांना याबाबतची निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक लावणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांना याबाबतची माहिती दिली पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचे राज्यात सरकार होते, तेव्हा राज्यापालांना याबाबत कळवले होते. मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळाकडून अद्यापही राज्यपालांना विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याबाबत कळवलेले नाही. यामुळे आम्ही राज्यपालांना अवगत केले. याआधारावर ही निवडणूक घ्यावी किंवा राज्यपालांनी सरकारला त्याबाबतच्या सूचना करावी, असे शिष्टमंडळाने राज्यपालांना सुचवले असल्याचे दानवे म्हणाले.
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक झाली पाहिजे. कारण ही निवडणूक न होणे, हे घटनेच्या विरोधात आहे. घटनाबाह्य आहे, याची जाणीव महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना करून दिली. महाविकास आघाडीच्या या भूमिकेला राज्यपाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असं दानवे यांनी सांगितलं. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून निरोपाच अधिवेशन आहे, त्यामुळे सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.



