बुधवार, १० जुलै
फसवणुकीतील रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक बागुल (वय ५६ वर्ष) लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे.
लाच लुचपतच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या परिचित महिलेने क्रेडिट सोसायटीत पैसे दुप्पट करून देण्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे २७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी १७ लाख ५० हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले होते.
उर्वरित दहा लाख रुपयांची रक्कम देण्यास संबंधित महिलेने टाळाटाळ केली. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीने सदर महिलेच्या क्रेडिट सोसायटीत जाऊन पैशाचे विचारणा केले तेव्हा महिलेने तक्रारदाराविरोधातच टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावून बागुल यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.
त्यावेळी बागुल यांनी संबंधित महिले कडून पैसे काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराची पोलीस निरीक्षक बागुल यांना पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती ३५ हजार रुपये घेण्यास बागुल तयार झाले होते.
पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावत बागुल यांना ३५ हजार रुपयांची लाज घेताना रंग हात पकडले लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी बागुल यांच्याकडून लाचेची रक्कम ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.



