शनिवार १३ जुलै
पावसाळी अधिवेशन संपताच संगमनेरमध्ये परतलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळीच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बुधवारी सायंकाळच्या वेळी जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात केलेल्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने तिच्या दीड वर्षीय चिमुकलीला आपल्या जबड्यात पकडून जवळच्या गवतात नेले होते. हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी बिबट्यामागे गवतात धाव घेत त्याला हूसकावून लावले. गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षीय चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या ओवी सचिन गडाख या दीड वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबीयांचे थोरात यांनी सांत्वन केले.
संगमनेर तालुक्यातील बिबट्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता थोरात यांनी मानवाला नुकसान पोहोचवू शकणाऱ्या या नरभक्षक बिबट्यांना पकडण्यासाठी आवश्यक तेथे तेथे पिंजरे लावण्याचे निर्देश दिले. तसेच मृत मुलीच्या कुटुंबीयांना शासकीय मदत तात्काळ मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिले.


