विशेष प्रतिनिधी / मुंबई
पक्ष फुटीचे अनेक दरवाजे ओलांडणारे काँग्रेसचे बांद्रा येथील आमदार बाबा सिद्धिकी यांचे पुत्र झिशान सिद्धिकी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बांद्रा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीला सांगलीप्रमाणे धडा शिकवू असा इशारा दिला आहे.
महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता, याची आठवण झिशानने करून दिली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटात समावेश केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे पुत्रे झिशान सिद्दीकी हे एकटे पडले आहेत. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी मतफुटीचे राजकारण केले. या सर्व पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांचा विधान सभेसाठी पत्ता कट होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दीकी यांनी विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळावे यासाठी काँग्रेसला निर्वानीचा इशारा दिला आहे
आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण सरदेसाई या मतदारसंघात सक्रियही झाले आहे. जर महाविकास आघाडीने वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून संधी दिली तर झिशान सिद्दीकी यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट आहे. झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती. याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नाही तर या ठिकाणीही सांगलीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे.
झिशान सिद्दीकी म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नक्की मागेल. जर ही जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडली तर या ठिकाणी देखील सांगली सारखीच परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे किती काही झालं तरी मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे. जनता मला नक्कीच निवडून देईल, असा विश्वास झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षात आमच्यासारख्या नवीन नेतृत्वाला त्रास देण्याचा काम सुरू असल्याचा आरोपही केला. विधानपरिषदेत मत फुटल्याच्या आरोपाला उत्तर देताना झिशान सिद्दीकी म्हणाले की, विधानपरिषदेत कोणाची मतं फुटली हे काँग्रेस पक्षाने कसे ओळखले? गेल्यावेळी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, तेव्हा देखील असेच म्हटले गेले. पण तेव्हा कोणावरही कारवाई का झाली नाही, असे प्रश्न झिशान सिद्दीकी यांनी पक्ष नेतृत्वाला विचारले आहे.


