सोमवार, २९ जुलै
पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, “माझा माणूस दुकानात येईल, त्याला जी वस्तू हवी ती द्या,” असे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या दोघांपैकी पोलीस असलेल्या तोतयाला अटक करण्यात आली असून तोतया पोलीस इन्स्पेक्टरचा शोध सुरू आहे.
नितीन बोराडे असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध सुरू आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गणेश पुजारी हा दुकानदारांना फोन करत “मी पोलीस इन्स्पेक्टर बोलत आहे, माझा माणूस दुकानात येईल. त्याला जी वस्तू हवी आहे ती द्या”, असे सांगत असे. त्यानंतर नितीन बोराडे त्या दुकानात जायचा. वस्तू घ्यायचा, पैसे साहेब देतील, असे सांगून तेथून निघून जात असे.
गणेश पुजारी याच्या व्हाट्सअप डीपीवर पोलिसाचा लोगो आणि युनिफॉर्मचा फोटो ठेवलेला होता. त्यामुळे दुकानदारांना तो पोलीस आहे, हे खरे वाटायचे. याची कुणकुण लागतात कोळसेवाडी पोलिसांनी नितीन बोराडे याला सापळा रचून अंबरनाथ परिसरातून ताब्यात घेत अटक केली.
नितीन बोराडे हा उच्चशिक्षित असून कोणताही काम धंदा करत नसल्याने त्याने मित्रासोबत तोतया पोलीस बनून अनेकांना गंडा घातला आहे. दोन्ही आरोपींनी कल्याण, अंबरनाथ परिसरात अशा प्रकारे अनेक दुकानदारांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.


