लहानपणी आई डबा करून दयायची पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलेव की खूप वाटायचं. आपणही खावं पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं. मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली.
लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले. सुती कपडे महाग झाले.
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून दयायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले.
लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा. अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो. वाटायचं आपणही प्यावा पण? आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.
लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकीमधून फिरताना बघायचो, वाटायचं आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वाना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत.
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती, भात खाताना आपणही खावं असं वाटायचं. आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत.
लहानपणी झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं, आज तेच बंगलेवाले मनशांतीसाठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडी (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत.
शेवटी अंतर तेवढंच राहिलं…
आता कळलं… हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं, जसा आहे, तसाच रहाणार. कुणाचं पाहून बदलणार नाही. मित्रानो आहे तसेच राहा, जे तुमच्याकडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे. (साभार – समाज माध्यम)


