बुधवार, १४ ऑगस्ट
बिबट्या घरात घुसल्याने घराला बाहेरून कुलूप लावून घेतल्याने बिबट्याला पकडण्यासाठी गर्दीचा अडथळा येत होता, त्यामुळे पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार करावा लागला होता. या घटनेत पोलिसांनी घराला कुलूप लावून बिबट्याला कोंडून घेणाऱ्याला जबाबदार ठरवत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तब्बल दहा वर्षानंतर या पदाधिकाऱ्याची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित हा खटला असल्याने याकडे संगमनेर-अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील माळीझाप येथे ३ एप्रिल २०१४ रोजी भाऊसाहेब आल्हाट यांच्या राहत्या घरात ही घटना घडली होती. आल्हाट यांच्या घरात घुसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच अकोले तालुका भाजपचे सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक आणि स्थानिक रहिवाशांनी आल्हाट कुटुंबीयांना घराबाहेर काढत घराला बाहेरून कुलूप लावून बिबट्याला घरात कोंडून घेतले होते.
बिबट्याला घरात कोंडल्यानंतर आणि आल्हाट कुटुंबीयांना घराबाहेर काढल्यानंतर मंडलिक यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली होती. आल्हाट यांच्या घरात बिबट्याला कोंडल्याचे वृत्त अकोले परिसरातील माळीझाप, गुरवझाप, नवलेवाडी आदी भागात पसरले होते. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याला कोंडलेल्या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
गर्दीमुळे घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे वनविभागाने घटनास्थळी असलेल्या पोलिसांना बघ्यांच्या जमाव पांगविण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. मंडलिक यांनीच घराला बाहेरून कुलूप लावून बिबट्यास घरात कोंडल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
कनिष्ठ न्यायालयात हा खटला चालला. कनिष्ठ न्यायालयाने मंडलिक यांना दोषी ठरवत शिक्षा आणि दंड केला होता. त्यानंतर मंडलिक यांनी या विरोधात जेष्ठ विधीज्ञ अनिल आरोटे यांच्यामार्फत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर या खटल्याचे काम सुरू होते. सुनावनीनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश घुमरे यांनी अकोले न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द ठरवत सबळ पुराव्याअभावी मंडलिक यांची तब्बल दहा वर्षाचा कालखंडानंतर निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ॲड. अनिलकुमार आरोटे आणि ॲड. धनंजय भोंगळे यांनी मंडलिक यांच्या वतीने काम बघितले.


