गुरुवार, २२ ऑगस्ट
मुंबई : बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे.
बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवत बदलापुरातील घटनेवर चर्चा करण्यात आली. आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी होणार असून डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.


