विशेष प्रतिनिधी / मुंबई
शनिवार, २४ ऑगस्ट
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही तयारी केली जात असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाहून पहिलं लक्ष्य हे युतीचं सरकार पदच्युत करणं हे पाहिलं ध्येय असेल असं म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत एकमत होत नाहीे, अशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, माझा पूर्ण पाठिंबा असेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्रीपदाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे, मुख्यमंत्रीपद हे दुय्यम असेल असं शरद पवार यांनी जाहीर करत महाविकास आघाडीच्या धोरणाची जाणीव सहकाऱ्यांना करून दिली.
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रीपदात रस नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. त्यापेक्षा आम्हाला राज्याच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे. सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन देणं, ही आमची प्राथमिकता आहे.
बदलापूर येथील घटनेचा उल्लेख करताना पवार म्हणाले, बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कायक आहे. आरोपीतांवर कठोर कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारने अशा प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. बदलापूरच्या आंदोलनात राजकीय सहभाग असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत असं विचारता असता ते म्हणाले, यामध्ये कोणीही राजकारण आणलं नाही, आमच्या मनात देखील असं नाही. लहान मुलांवरील अत्याचाराबाबतच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन होतं. त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघू नये, त्या बालिकांवर झालेल्या या घटनेनंतर कोणीही त्याचं राजकारण करू नये, असं मला वाटतं.
साखर कारखानदारांना दिलेल्या पैशांबाबत न्यायालयाने केलेल्या टिपण्णीवर बोलताना ते म्हणाले, सहकार चळवळ आणि कृषी-औद्योगिक विकासात राजकारण कधीच आलं नाही. राज्य सरकार एक नीती तयार करते आणि त्यात सगळ्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत मिळवून देते, पण आता तसं होताना दिसत नाही. यात राजकारण होत आहे.


