रविवार, दि. ०१ सप्टेंबर
संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील सहकार, शिक्षण, समाजकारण अतिशय चांगले असून काही लोकांना ते पाहावत नाही. येथे असलेल्या चांगल्या राजकारणामुळे तालुक्यातील जनतेचे प्रपंच टिकून आहे. मात्र हे प्रपंच मोडण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहे. तालुक्यात रस्त्यांची अनेक कामे मंजूर असून मुरूम, खडी अभावी ती बंद आहेत. दररोज नवनवीन अडचणी निर्माण केल्या जात आहे. मात्र जनतेच्या पाठिंबावर आपण लढत आहोत. तीन महिन्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून त्यानंतर सर्व दुरुस्ती होईल.
दुग्ध व्यवसाय अत्यंत कष्टाचा आणि अडचणीचा असताना देखील संगमनेर तालुक्यात दररोज सात लाख लिटर दुध उत्पादन होते. त्यामुळे दुधाचा तालुका अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. राजहंस दूध संघाने गुणवत्ता आणि चांगल्या कारभारातून राज्य पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. हा सहकारी संघ या पुढील काळात सर्वांना जपायचा आहे. गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा राजहंस दूध संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा संघ आहे.
सहकारी दूध संघामुळे खाजगी दूध संघांवर नियंत्रण असते. खाजगी संघावाले नफा कमविण्यासाठी काम करतात. पन्नास पैसे वाढीव दर मिळाला म्हणून काही लोक खाजगी दूध संघांना दूध देतात आणि त्यांनी भाव कमी केला की पुन्हा सहकाराकडे येतात, हे अत्यंत चुकीचे आहे. दुधाला भाववाढ मिळावी यासाठी आपण विधानसभा सभागृहात भांडलो म्हणून पाच रुपयांचे अनुदान मिळाले. शासनाने दिलेले पाच रुपयाचे अनुदान देखील शेतकऱ्यांना आपण वाटप केले आहे.
दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून कोरोना संकट काळात दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर निर्माण केली गेली, त्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात मुक्त गोठा व मुरघास ही अत्यंत चांगली संकल्पना राबविली जात आहे.
डॉ. जयश्री थोरात यांनी संगमनेरमध्ये होत असलेल्या इंदिरा महोत्सवाअंतर्गत महिला उद्योजकता विकास योजनेबाबत माहिती दिली.
वर्षभरात ५३८ कोटींची उलाढाल…
राजहंस दूध संघाने या वर्षात ५३८ कोटींची उलाढाल केले असून ४०८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहे. मुरघास योजनेने तालुक्यात मोठी क्रांती केली. दहा मेडिकलच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये दुग्ध उत्पादकांना औषधे पुरविले जात आहे. गाईंचे आरटीपीसीआर टेस्ट राज्यात प्रथम संगमनेर मध्ये केली जात असल्याने गायीच्या तापाचे तातडीने निदान होते. त्यामुळे औषधोपचाराचा खर्च देखील कमी होतो. अमृतवाहिनी व स्टेट बँकेच्या माध्यमातून दीड हजार शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादन वाढीसाठी वीस कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून पंधरा हजार शेतकऱ्यांना विमा योजनेसह विविध योजनांसाठी स्मार्ट कार्ड दिले आहे. – रणजीतसिंह देशमुख, अध्यक्ष, राजहंस दूध संघ.



