गुरुवार, दि. ०४ सप्टेंबर
पनवेल : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत कागदपत्रांची पडताळणी सखोल न केल्याने गैरव्यवहार झाल्याची तक्रार सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी पनवेल तहसीलदारांकडे केल्यावर प्रशासनाला जाग आली आहे.
खारघर येथील महिला या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी त्या वारंवार ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टलद्वारे भरत होत्या. मात्र या महिलेच्या आधार कार्डवर सातारा जिल्ह्यातील महिलेने नोंदणी केल्याची धक्कादायक माहिती समजताच खारघर येथील महिलेने पनवेलची तहसीलदार कचेरी गाठली.
संबंधित लाभार्थी महिलेची माहिती घेतल्यावर या लाभार्थी महिलेच्या नावावर २७ वेगवेगळे अर्ज मंजूर झाल्याचे उजेडात आले. याबाबत तक्रार अर्ज मिळाला असून पुढील कार्यवाहीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्याचे पनवेलच्या तहसीलदारांनी सांगीतले.
खारघर येथे राहणाऱ्या पूजा महामुनी या खारघर येथील भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. वारंवार अर्ज ऑनलाइन भरूनही नोंद होत नसल्याने माजी नगरसेवक बाविस्कर यांना संशय आला. या संकेतस्थळावर पूजा यांचे आधारकार्डवर यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील इतर महिलेच्या नावाची नोंदणी झाल्याचे समोर आले.
ज्या लाभार्थींच्या नावाने अर्ज नोंदणी झाला त्या महिलेशी संपर्क साधल्यावर फोनवरील व्यक्तीने सुरुवातीला त्याची माहिती देण्यास टाळाटाळ केली. अनेकदा विनंती केल्यानंतर त्याने आधारकार्डवरून नव्याने ओटीपी माजी नगरसेवक बाविस्कर यांना दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.



