मंगळवार, ०८ ऑक्टोंबर
राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक ऊद्योग समुहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात सोमवारी रात्री एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून मुरकुटे यांना रात्रीच त्यांच्या श्रीरामपूर मधील निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती संध्याकाळी दिली जाणार आहे.

दरम्यान मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पिडीता बँक कर्मचारी असल्याचे समजते. पीडित महिलेने सोमवारी संध्याकाळी राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी फिर्याद दिली होती. या दरम्यान कामानिमित्ताने मुरकुटे सोमवारी मुंबईत होते. ते रात्री उशिराने घरी परतल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. 
मुरकुटे यांच्यावरील कारवाईला पोलीस यंत्रणेकडून दुजोरा देण्यात आला असला तरी अद्याप या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतरच या प्रकरणाची स्पष्टता होणार आहे.
दरम्यान पोलिसांनी मुरकुटे यांना अटक केल्यानंतर रात्री त्यांनी रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

