रविवार, २७ ऑक्टोबर
शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप रविवारी आठ महिन्यानंतर पुन्हा स्वगृही परतले आहे. घोलप यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पुन्हा एकदा शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे.
घोलप यांनी आठ महिन्यांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली प्रवरा मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून ठाकरे गटाने घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. बबनराव घोलप यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर देखील योगेश घोलप शिवसेनेसोबत होते.
योगेश घोलप यांना उमेदवारी दिल्यानंतर बबनराव घोलप यांनी पुन्हा सह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रवेशाची शिष्टाई करत पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. घोलप यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या पुनरुत्थनासाठी घोलप यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगत त्यांच्यावर नाशिक शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली आहे.
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमा वेळी युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे, माजी नगरसेवक भैय्या मणियार, तालुकाप्रमुख प्रकाश मस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरेंचे माजी मंत्री ‘नाना’ पुन्हा स्वगृही…
आठ महिन्यातच पुन्हा स्वगृही

