सोमवार, २८ ऑक्टोंबर
अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पैकी दहा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले असून महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर झाले आहे. महायुतीचा नेवासे आणि संगमनेर या दोन जागांवरील तिढा अद्याप कायम आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पाच जागा मिळाल्या असून या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे तीन आणि चार विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

श्रीरामपूरच्या जागेसाठी महायुतीकडून रामदास आठवले यांचे समर्थक कार्यकर्ते इच्छुक होते. आठवले गटाने या जागेवर दावा सांगितला होता. मात्र जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथून काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या माजी आमदार लहू कानडे यांना उमेदवारी अंतिम झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता आरपीआयचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

तर संगमनेर आणि नेवासे या दोन मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अद्यापही जाहीर झाले नसल्याने या जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. जिल्ह्यात झालेल्या जागा वाटपात अद्याप शिंदे गटाला एकही जागा मिळाल्याचे दिसत नाही. संगमनेर आणि नेवासे या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. संगमनेरमधून उमेदवारी करण्यासाठी माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते. मात्र ही जागा भाजपला जाणार नसल्याचे स्पष्ट होत असून या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. याशिवाय नेवासे या मतदारसंघाबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा (मंगळवार) अंतिम दिवस असून या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण निवडणूक लढविणार आणि या जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. असे असले तरी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होणाऱ्या उमेदवाराला मात्र या मतदारसंघात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
अहिल्यानगर मधील जागावाटप आणि उमेदवार पुढीलप्रमाणे…
संगमनेर ?
नेवासे ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार…
अकोले – डॉ. किरण लहामटे
पारनेर – काशिनाथ दाते
श्रीरामपूर – लहू कानडे
कोपरगाव – आशुतोष काळे
अहिल्यानगर शहर – संग्राम जगताप
भारतीय जनता पक्ष…
कर्जत-जामखेड – प्रा. राम शिंदे
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे
राहुरी – शिवाजी कर्डिले
शिर्डी – राधाकृष्ण विखे


