
मंगळवार, २९ ऑक्टोबर
मला माहिती नाही, राजकारणात नेते निष्ठावंत असतील का नाही, ते सांगता येत नाही. पण कार्यकर्ता कायम निष्ठावंत असतो. ५०० कोटींची संपत्ती असणारा नेता तिकिटासाठी बाप बदलल्यासारखा रात्रीच पक्ष बदलतो, मग अन्याय होतो तो कार्यकर्त्यांवर, कारण त्यांची भूमिका प्रामाणिक असते. पण नेत्यांनी केलेली तडजोड ही कार्यकर्त्यांच्या भावनेवर अत्याचार करणारी असतांना परिस्थितीअभावी त्याला शांत बसल्याशिवाय पर्याय नसतो.


हल्ली राजकारणात “निष्ठावंत” राजकारणी बोटांवर मोजण्याइतके आहे, खरंतर आधुनिक राजकारणात निष्ठावंतापेक्षा “विष्ठावंत” नेत्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. नाईलाजाने जागरूक कार्यकर्त्यांलासुध्दा पर्याय नसल्याने या विष्ठावंत नेत्यांच्या भूमिकेशी समरस व्हावे लागते. तो कार्यकर्त्यांच्या भावनेवर अत्याचार ठरतो. हल्ली राजकारणात सत्ता ऐन केन मार्ग वापरून मिळवता येते. राजकारण सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे गणित ठरले.
राजकारणात गद्दाराच्या फौजा तयार झाल्या. निवडणुकीच्या आखाड्यातसुद्धा मतदारांशी प्रतारणा करून विरोधी नेत्यांना हाताशी धरून तिकीट कुणाला द्यायची, तुल्यबळ उमेदवार टाळून गरीब दुबळे उमेदवार देऊन सल्ल्यात कुस्त्या जिंकण्यासाठी महाराष्ट्रभर प्रयोग चालू आहे. 
अनैतिक तडजोडी करून मतदार असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना पायाशी तुडवून राजकारणाचा खेळ चालू झाला. ज्याच्यासाठी कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात कामधंदे सोडून रस्त्यावर आला, त्याच राजकीय नेत्यांनी खुर्ची, सत्ता, पदासाठी रात्रीच्या अंधारात पडद्याआड खेळलेला डाव कार्यकर्त्यांच्या भावना विचारात न घेता केलेल्या तडजोडी कार्यकर्त्यांचे सामर्थ्य खच्ची करणाऱ्या असतात. 
त्यामुळे नेता निवडताना कार्यकर्त्यांनी उघड्या डोळ्यांनी निवडला पाहिजे. सत्तेसाठी, तिकिटासाठी, पैशासाठी पक्ष बदलणारे, भूमिका बदलणारे नेते कोण? आपण विचारात घेतले पाहिजे.
खरंतर कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असेल तो एकनिष्ठ असतो, वेळ आली तर जवळच्या माणसाशी वैर घेऊन नेत्यांसाठी डोके फोडतो. जेलमध्ये जाऊन बसतो. तेव्हा वेदना कार्यकर्त्याना होतात. कार्यकर्त्यांच्या घरावर वेळ येते तेव्हा नेते गायब होतात. नेत्यांना कार्यकर्ता हा झेंडे धरण्यासाठी, मोर्चे करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, चपला उचलण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाण्यासाठी, अंगावर केस घेण्यासाठी हवा असतो. तिकिटासाठी नातेवाईक पाहिजे असतो. 
त्यामुळे कोणतीही भूमिका घेताना दहा वेळेस विचार करा. खरंतर पाऊले जबाबदारीपूर्वक काम करा. जेणेकरून आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होऊ नये. त्याचा विचार करा. निवडणुका येतील जातील. नवे गडी सत्तेत येतील, जुने जातील. बदल होईल अगर आहे ती परिस्थिती कायम राहील. पण आपण ज्या मतदारसंघात, गावात, शिवारात राहतो तिथला माणूस कायम तिथेच राहतो. तो आपल्या सुखदुःखात सामील होतो.
राजकारणामुळे संबंध तोडू नका. राजकारणाचे जोडे घराचे बाहेर काढा. मित्र आणि मदतीला येणारे माणस जपा. शेवटी राजकारण “सेवा” म्हणून करायला आलेल्या नेत्यांनी त्याचा “धंदा ” मांडला. नेते आतून एकमेकांचे गुप्त मित्र असतात तर कार्यकर्ते उघड शत्रू असतात. कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक काम केले पाहिजे. त्यामुळे आपण जागरूक होऊन भूमिकेशी सहमत असणाऱ्या नेत्यांला काळजीपूर्वक पूर्वातिहास तपासून मतदान करा. जेणेकरून आपल्याला मत वाया गेल्याचा, अगर नेत्यांच्या वर्तनाचा त्रास होऊ नये.
अँड. गोरक्ष कापकर, संगमनेर
मो. ९९२१३८६९८४

