
शनिवार, ०२ नोव्हेंबर
पुणे – दोन महिन्यांपूर्वी संगमनेर मधील झरेकाठी येथील विवाहितेने पुण्यामध्ये आत्महत्या केली होती. पतीसह सासू-सासऱ्या विरोधात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयाने सासू-सासऱ्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
हुंड्याच्या मागणीच्या कारणावरून झरेकाठी येथील विवाहित महिलेने पुण्यामध्ये आपल्या आईच्या घरी आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी ०१ सप्टेंबरला पुण्यात घडली होती. यासंदर्भात पुण्याच्या रावेत पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रावेत पोलिसांनी याप्रकरणी विवाहितेच्या पती आणि सासर्याला १९ सप्टेंबरला पहाटेच्या वेळी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथून अटक केली होती.

संगमनेर येथील वकील ऋषिकेश वाणी यांच्या वतीने आरोपी पती आणि सासऱ्याने नियमित जामिनासाठी तर सासूने अटकपूर्व जामीन अर्ज वडगाव मावळच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. या जामीन अर्जांवर सुनावणी पार पडली.
न्यायालयासमोर आरोपीचे वकील वाणी यांनी सदरचा गुन्हा आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी पंधरा दिवस उशिराने केलेल्या फिर्यादीवरून रावेत पोलिसांनी दाखल केला. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे सासू-सासरे पुण्यात राहत नाहीत. आरोपींनी विवाहिता आणि तिच्या घरच्यांकडून कोणत्याही प्रकारे हुंड्याची मागणी केली नाही, तसा कोणताही पुरावा न्यायालयासमोर नाही. आरोपींविरोधात सदरच्या गुन्ह्यात पुरेसा पुरावा उपलब्ध नाही, असे न्यायालयात केलेल्या युक्तिवादात म्हटले.
वडगाव मावळ जिल्हा न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. तक्रारीत सासू-सासर्यांवर करण्यात आलेले आरोप किरकोळ स्वरूपाचे आहेत. ते दोघेही वयस्कर आहेत. त्यांच्या पोलीस कस्टडीची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष नोंदवत काही अटी व शर्तीवर सासू-सासऱ्यांचा जामीन मंजूर केला तर मुख्य आरोप पती विरोधात असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
विवाहितेची पुण्यात आत्महत्या, संगमनेरच्या झरेकाठीतील सासू-सासर्यांना जामीन
वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय

