शनिवार, १६ नोव्हेंबर
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडचा आठवा बॉयलर अग्नि प्रदीपन व गणित हंगामाचा शुभारंभ रविवारी (१७ नोव्हेंबर) होत आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते हा समारंभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या कौठे मलकापूरच्या माळरानावर आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी रोवली होती. गेल्या सात वर्षात कारखान्याने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे.
कारखान्याला दरवर्षी कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागतो. यावर्षी देखील कारखाना व्यवस्थापनाने नव्या जोमाने गळीत हंगामाची तयारी केली आहे. रविवारी सकाळी दहा वाजता संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी बिरोले यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ होत आहे.
तर श्रीगोंदा येथील बिरू कारंडे व त्यांच्या पत्नी मंदा, नागापूर (पारनेर) येथील किरण मिंडे व त्यांच्या पत्नी सुरेखा, गुहा (राहुरी) येथील सुखदेव कोळसे व त्यांच्या पत्नी मथुराबाई, बिरेवाडी (संगमनेर) येथील बाबाजी सागर व त्यांच्या पत्नी मंगल तसेच आरडगाव (राहुरी) येथील अंबादास काळे व त्यांच्या पत्नी शारदा यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे.

