शनिवार, ०७ डिसेंबर – संगमनेर
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीवर महायुतीच्या झेंडा फडकला आहे. माजी सरपंच ॲड. मीनानाथ शेळके समर्थक असलेले निखिल निळे सरपंचपदाच्या निवडणुकीत निवडून आले.
काँग्रेस उमेदवाराचा पराभव – शिवसेनेचे शिंदे सरपंच पदाचे उमेदवार निखिल निळे यांनी काँग्रेस उमेदवार किसन कवडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. सरपंच निवडीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्योती ससे यांनी काम बघितले. संगमनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नांदुरी दुमाला ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. या ग्रामपंचायतीवर तत्कालीन काँग्रेसचे मीनानाथ शेळके यांचे वर्चस्व होते शेळके यांच्या पत्नी अर्चना शेळके ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या.
राजीनाम्यामुळे रिक्त जागेवर निवडणूक – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मीनानाथ शेळके यांनी भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत गावातील एका कार्यक्रमात शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारादरम्यान झालेल्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ त्यांच्या पत्नी अर्चना शेळके यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या जागेवर निवडणूक घेण्यात आली.
काँग्रेससाठी निवडणूक होती प्रतिष्ठेची – काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे किसन कवडे आणि महायुतीचे निखिल निळे यांच्या निवडणूक झाली या निवडणुकीत निळे यांनी एका मताने विजय संपादन करत ग्रामपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकविला आहे.
एका मताने विजय – कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यासाठी काँग्रेसने मोठे प्रयत्न केले मात्र त्यांना त्यात यश आले नाही. शेळके यांचे या ग्रामपंचायतवरील वर्चस्व कायम राहिल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून आले. महायुतीचे निखिल निळे यांना ६ तर काँग्रेसचे किसन कवडे यांना ५ मते मिळाली त्यानंतर निवडणूक निर्णय आधिकारी ज्योती ससे यांनी निखिल निळे यांची सरपंचपदी निवड झाली असल्याचे जाहीर केले त्यांना ग्रामसेवक अशोक गुंजाळ यांनी सहाय्य केले.
काँग्रेसच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतीवर महायुतीचा झेंडा, सरपंचपतीने काही दिवसापूर्वीच केला होता शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश
गावातील प्रमुख नेते असलेले शेळके काही दिवसांपूर्वी गेले होते शिवसेनेत

