विशेष प्रतिनिधी / मुंबई
गुरुवार १२ डिसेंबर – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीत मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यामुळे आणि कोणाला किती मंत्रिपद द्यायची? कुठली खाती द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय. 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. पण भाजपा हे खाते सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेला शांत करण्यासाठी शिंदे यांच्या पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरविकास (UD) खात्यांची ऑफर दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मंत्रिमंडळात विस्तारावर महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार यावर शिक्कामोर्तब होणार असून, त्याआधीच मंत्रिमंडळाच्या तिन्ही पक्षातील मंत्रिपदाचा फॉर्म्युलादेखील निश्चित झाल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे मंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. 
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्लीवारीनंतर आज तिन्ही पक्षाची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुंबईत बैठक होणार असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं द्यायची? यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. खरं तर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आधीच तयार झालाय. पण आज बैठकीत केवळ औपचारिकता पूर्ण केली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशनाला अवघे तीन दिवस बाकी असताना मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांची शपथविधी हे अधिवेशन अगोदर घेण्याचं आव्हान महायुतीसमोर असल्याने आज कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीला निर्णय घेणं गरजेचं आहे.
बुधवारी एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य विषयांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार असून, मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबर रोजी होणार आहे. यात सर्वाधिक भाजपाचे मंत्री घेणार शपथ आहेत. भाजपाला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार आहेत. तर उर्वरित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळणार आहेत. २३-१२-९ चा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

