मंगळवार १७ डिसेंबर
संगमनेर – शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने सध्या गटारी आणि आणखी काही कामे सुरू आहे. मात्र या कामांसाठी अचानकपणे रस्ते बंद करण्यात आल्याने संगमनेरकर नागरिकांची मोठे गैरसोय होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भागातील रस्ते, चौक बंद करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच संबंधित रस्ते किती कालावधीसाठी बंद राहणार आहे याची माहिती नागरिकांना देण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेच्या पथ विक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा या परिसरात, कवी अनंत फंदी नाट्यगृहापाशी, बाजारपेठेत नगर परिषदेच्यावतीने काम सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र रस्ते बंद करताना पुरेशी काळजी घेतली न गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दुचाकी चार चाकी वाहने थेट कामाच्या ठिकाणापर्यंत जातात, त्यानंतर बंद असलेला रस्ता बघून त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागते.
रस्ते बंद करताना लावण्यात आलेले बॅरिकेट हे कामाच्या ठिकाणी लावले गेले आहे. वास्तविक जेथे काम सुरू आहे त्या रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी बॅरिकेट लावणे अपेक्षित आहे. मात्र हे बॅरिकेट अगदी कामाच्या ठिकाणी लावण्यात आल्याने तिथपर्यंत गेलेल्या नागरिकांना आपल्या दुचाकी, चार चाकी घेऊन पुन्हा माघारी फिरावे लागते आणि पर्यायी रस्त्याने ये-जा करावी लागते. एकाच वेळी तीन ठिकाणी सुरू असलेल्या या कामांमुळे शहराच्या जुन्या भागातून उपनगर, बसस्थानकाकडे येणाऱ्या आणि उपनगरातून शहराच्या जुन्या भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पुन्हा माघारी फिरून मोठा वळसा घालून दूरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.
वास्तविक रस्त्याच्या सुरुवातीलाच आणि शेवटी बॅरिकेट लावून तो संपूर्ण रस्ता बंद करणे अपेक्षित आहे. तेथेच संबंधित कामाचे सूचना फलक देखील लावले जायला हवे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे संगमनेर नगर परिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी यात लक्ष घालून योग्य त्या सूचना संबंधितांना द्याव्यात, असे साळुंके यांनी म्हटले आहे.



