गुरुवार १९ डिसेंबर
मुंबई – विधान परिषदेच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या निवडीचे औपचारिक घोषणा केली. शिंदे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.
विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज (१९ डिसेंबर) श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. याला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. 


विधान परिषदेच्या उपसभापति डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राम शिंदे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सभागृहात केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.
फडणवीस यांनी विरोधकांचेही मानले आभार – “राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपती एकमताने निवड करण्यात आली याबद्दल मी सभागृहाचे आभार मानतो, आपली उच्च परंपरा आहे की सभापती या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी सर्वांनी शक्यतो एकमताने सभापतींती निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय विरोधा पक्षाने घेतला त्यासाठी विरोधी पक्षाचेदेखील आभार मानतो.

