शनिवार २१ डिसेंबर
संगमनेर – सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असलेल्या संगमनेरमध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बालभारतीचे डॉ. अजितकुमार लोळगे, पुणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दिपाली जोगदंड, राजेंद्र वाकळे, प्रकल्पप्रमुख प्रकाश पारखे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, या कला महोत्सवाच्या माध्यमातून बालकांच्या कलागुणांना मोठा वाव मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कला महोत्सवात ७२०० विद्यार्थी सहभाग नोंदवणार असून एकाच वेळी त्यांचे समूहगान लक्षवेधी ठरेल, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. गायन, वादानाबरोबरच वेगवेगळे छंद विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजे. या शिबिराच्या माध्यमातून स्क्रीन पेंटिंग, अक्षरलेखन, मातीकाम, निसर्ग चित्र, सौंदर्यप्रसाधने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचे प्रशिक्षण तज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळ आणि खेळाबरोबर छंद देखील महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.

डॉ. तांबे म्हणाले, संगमनेरचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कला महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. निरोगी सुदृढ समाज निर्मिती हे युवकांच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य असून पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा या सर्व पातळ्यांवर काम केले जात आहे. चांगल्या समाजासाठी चांगले युवक घडविणे आवश्यक असून हे संस्कार बालपणीच मिळाले तर सक्षम भारताच्या निर्मितीसाठी भविष्यात हे युवक उद्या योग्य रीतीने काम करतील.
सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर प्रकल्पप्रमुख प्रकाश पारखे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, कला व क्रीडा शिक्षक आणि एक हजारावर विद्यार्थी उपस्थित होते.
२१ स्टॉलच्या माध्यमातून ३ दिवस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण…
कला महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे २१ प्रकारचे विविध कलांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. यामध्ये ओरिगामी, स्क्रीन पेंटिंग, पेपर कटिंग, रांगोळी, कागदी फुले बनविणे, पतंग बनविणे, सायकल रिपेरिंग, मातीकाम, निसर्ग चित्र, कॅनव्हास पेंटिंग, अक्षरलेखन, माहिती तंत्रज्ञान, सौंदर्यप्रसाधने अशा विविध स्टॉलचा समावेश आहे. तीन दिवस हा कला महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून विद्यार्थ्यांसह पालक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. – दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्ष संगमनेर.

