गुरुवार, २६ डिसेंबर
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कचाट्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ७० लाखांहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे महिलांना सन्मान निधी मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. – आदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री.



