मुंबई – महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या दृष्टीने एक जीवनदायी योजना ठरलेली आहे. २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे समाजातील सर्वसामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळतोय.
तथापि, या योजनेत आणखी सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले उपचार दर मुंबई, पुणे आणि सर्वच जिल्ह्यांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे या मोठ्या शहरांमधील रुग्णालये योजनेत समाविष्ट होण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत.
तसेच पुरेशा बेड अभावी किंवा एखादा आजार योजनेत बसत नाही म्हणून रुग्णांना नाकारले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची ससेहोलपट होते. त्यामुळे आणखी आजारांचा यात समावेश करण्याची व रुग्णालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी व दातांवरील उपचार यांचा या योजनेत समावेश करण्याची गरज आहे. या अनुषंगाने राज्य सरकारकडे तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहे.
तांबे यांनी यासाठी दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या तत्कालीन आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. १ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी दंत उपचारांचा सहभाग महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्यापही काहीही कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे उपरोक्त सर्व मागण्यासंह एकंदरीतच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अनुषंगाने तांबे यांनी मंगळवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तातडीने यासंदर्भात बैठक लावावी, अशी विनंती केली. यावर मंत्री महोदयांनी पुढील पंधरा दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन तांबेंना दिलं आहे.


