संगमनेर – स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकतेच दिव्यांग शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये २२८ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यातील १३६ व्यक्तींना आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
सोमवारी (६ जानेवारी) रोटरी आय केअर हॉस्पिटल येथे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांमधून १३६ दिव्यांग व्यक्तींना १६२ प्रकारचे साहित्य वाटण्यात आले.
वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आरएनसीटी अत्याधुनिक पाय, एल एन ४ प्रोस्थेटिक हात, जयपुर फुट, कुबडी आदि साहित्याचे वाटप करण्यात आले, या साहित्याची अंदाजीत रक्कम सुमारे १ कोटी रुपये असून यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था, अशोक मंडळ या संस्थांनी व रोटरी सदस्यांनी मदत केली अशी माहिती क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी दिली.
या साहित्याचे वाटप यशोदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाई शाह यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रोटरी क्लब करीत असलेल्या कामाविषयी गौरोद्गार काढले, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींना जमेल त्या सर्व प्रकारे या कामांसाठी मदत करण्याचे आवाहन केले.
यावेळी रोटरी क्लबचे वार्षिक कॅलेंडर प्रकाशन उपस्थित सदस्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अपघातात तसेच काही काम करीत असतांना आपले हात व पाय गमाविलेल्या व्यक्तींना या प्रोस्थेटिक उपकरणांची विशेष आवश्यकता असते. अशा उपक्रमांमुळे व्यक्तीला चालणे, उभे राहणे तसेच सर्वसामान्य कामे करणे या क्रिया सहज सोप्या होऊ शकतात, तसेच त्यांच्यात अधिक आत्मविश्वास प्राप्त करुन ते स्वावलंबी होतात. प्रोस्थेटिक उपकरणे व्यक्तीची विशेष गरज, शरीराचा प्रकार तसेच व्यक्तीची कार्यक्षमता यानुसार ही उपकरणे तयार केली जातात. यासाठी आधी व्यक्तींची मापे घेऊन ती उपकरणे तयार केली जातात.
या शिबीरासाठी सेक्रेटरी विश्वनाथ मालाणी, खजिनदार विकास लावरे, उपाध्यक्ष व प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, प्रकल्प समन्वयक अजित काकडे, डॉ. प्रमोद राजुस्कर, डॉ. सुजय कानवडे, डॉ. विनायक नागरे, दीपक मणियार, सुदीप वाकळे, आनंद हासे, डॉ. विकास करंजेकर, अमित पवार, राजेंद्र खोसे, महेश ढोले, अतुल वखारिया, संतोष आहेर सर्व रोटरी सदस्य, नेत्र रुग्णालयाचे कर्मचारी, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर्स आदिंनी विशेष प्रयत्न केले.
रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे २२८ दिव्यांगाची तपासणी, साहित्याचे वाटप!
या साहित्याची अंदाजीत रक्कम सुमारे १ कोटी रुपये असून यासाठी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था, अशोक मंडळ या संस्थांनी व रोटरी सदस्यांनी मदत केली