काही रकमेचा दिला परतावा… नंतर मात्र केली फसवणूक
नाशिक –
मोठी गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतवा देण्याचे आमिष दाखवत काही भामट्यांनी नाशिक शहरातील वृद्धाला तब्बल ३६ लाखाला गंडविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला काही रकमेचा परतवा देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासातून भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हरी शिंपी (वय ७२, रा. गजानन दर्शन सोसायटी, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका गोरे (रा. बर्डे नगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे (रा. समर्थ नगर, इंदिरानगर) या ठकबाजी करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी शिंपी यांचा विश्वास संपादन करत त्यांना काही रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना चार लाखाचा परतावाही त्यांनी दिला. मात्र नंतरच्या लाखो रुपयांचा परतावा न मिळालेले हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. संबंधित वृद्धाची ३६ लाखाची फसवणूक करण्यात आली असून तगादा करून देखील गुंतवणूक व नफा रक्कम पदरात न पडल्याने शिंपी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिरसाट पुढील तपास करत आहे.



