शुक्रवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये वीज वितरण कंपनीच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तब्बल तीन-चार तासांपासून गायब असलेली वीज रात्री उशिरापर्यंत न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अनेक घरांमधून सुरू आहे. त्यामुळे महिलांचे सायंकाळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने व त्यातच शहरातील महावितरण लाईटच्या बत्या गुल केल्याने अंधारातच हे कार्यक्रम सुरू होते.
दरम्यान गायब झालेल्या विजेचा परिणाम शहरात तसेच उपनगरात जाणवत असून अनेक नागरिकांनी या संदर्भात महावितरणच्या कार्यालयाकडे विचारणा करण्यासाठी दूरध्वनी केले असता नागरिकांचे दूरध्वनी घेण्याचे टाळण्यात आले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर त्यांनी देखील फोन घेतले नाही.
अंधाराचा गैरफायदा घेत शहरात जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला महावितरणच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहर आणि उपनगर अंधारात असल्याने तसेच महावितरणचे अधिकारी नागरिकांचे फोन घेण्याच्या टाळीत असल्याने महावितरण विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाज माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर टीकेचा भडीमार सुरू आहे.