शिर्डी दि. ३ फेब्रुवारी –
शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे. तर तिसऱ्या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याने साईबाबांची शिर्डी या गुन्हेगारी कृत्यामुळे हादरून गेली आहे.
या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत . घटनेची माहिती मिळूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तासाभराच्या अंतरात शिर्डीत तीन ठिकाणी चाकू हल्ल्याचे प्रकार घडल्याने शिर्डीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ला करून हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून अज्ञात हल्लेखोरांचा तपास सुरू करण्यात आला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नक्की घडले काय ?
आंतरराष्ट्रीय देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली. यात एक तरुण गंभीर जखमी आहे. शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली. यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत. नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला.
कुटुंबीयांचा आक्रोश, पोलीस उशिरा आल्याचा आरोप… शिर्डीमध्ये पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी तासाभराच्या अंतरात झालेल्या या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. एक तरुण गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांना कळविण्यात आले होते. मात्र घटना घडवून काही तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता. घटनेची माहिती कळूनही उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांची कुटुंबीय करत आहेत. हत्येला अपघाताचे स्वरूप दिल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे . दुसरीकडे माहिती कळाल्याबरोबर तात्काळ आलो असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.