विशेष प्रतिनिधी / मुंबई
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ०९ फेब्रुवारीला दोन महिने पूर्ण होतील. पण या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मीक कराड याला ताब्यात घेतले आहे.
वाल्मीक कराडवर खंडणीचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. परंतु, या वाल्मीक कराडवर आता धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनीही गंभीर आरोप केले आहेत.
वाल्मीकचा हस्तक्षेप हा मुंडेंच्या व्यवसायात किंवा राजकारणातच नाही तर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा होता का? याबाबतची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले घरगुती हिंसाचार प्रकरणातील आरोप मान्य केले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह खंडणी आणि संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केले आहेत.
वाल्मीक कराडने आपल्याला दमदाटी केली पण मी संघर्ष केला. त्यांनी माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा शारीरिक छळ केला. माझ्या कारमध्ये रिव्हॉल्व्हर टाकण्यात देखील वाल्मीक कराडचा हात होता, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडे यांच्या आरोपांमुळे वाल्मीक कराडचा केवळ बीडच्या राजकारणातच नव्हे तर कौटुंबीक वादात देखील हस्तक्षेप होता, याबाबतची माहिती समोर आली आहे.
मंत्री मुंडेंनी करुणा शर्मा-मुंडेंना दर महिन्याला दोन लाख रूपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर हिंसाचाराच्या घटना सांगताना करुणा शर्मा मुंडे यांना रडू कोसळले आहे. त्या प्रसार माध्यमांसमोर म्हणाल्या की, तीन वर्षांपासून मी लढा देत आहे. मी न्यायालय, वकील गणेश कोल्हे यांचे आभार मानते. पण, न्यायालयाने २ लाख रूपये देण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर मी समाधानी नाही. एका नोकराच्या नावावर ४ हजार कोटींची संपत्ती निघाली आहे.
मात्र, आमच्या नावावर एक रूपयांची संपत्ती नाही. माझा मुलगा २१ वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. आमचा महिन्याचा खर्च पाहता १५ लाख रूपये मिळाले पाहिजेत. याबद्दल मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे करुणा शर्मा मुंडे यांनी सांगितले.



