
विशेष प्रतिनिधी / मुंबई
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून खात्मा करण्यात येईल, अशी धमकी सावंत यांना दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे.
नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून चार दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आहे. कोरटकर सध्या फरार आहे. यातच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी दिल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने सावंत यांना दिली आहे. या धमकीमुळे कोल्हापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
धमकी आल्यानंतर सावंत यांनी आपल्या वकिलांची भेट घेतली आहे. वकिलांशी चर्चा करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सावंत यांच्यावतीने सांगण्यात आले.
इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले आणि त्याच्या निवासस्थानी छापा टाकला. पण, कोरटकर हा अगोदरच फरार झाला होता. कोरटकर हा मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, एक पथक तिकडे रवाना झाले आहे.



