
संगमनेर, दि. ३ मार्च
संगमनेर तालुक्याचे महसुली विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा घाट घातला गेला आहे. यावरून तालुक्यात वाद निर्माण झालेला असतानाच आता पालकमंत्री समर्थकांनी प्रस्तावित असलेले आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रतिनिधींना दिले आहे.
हे कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, महीला, विद्यार्थ्यांची अडचण दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे तालुक्यातील अपर तहसील कार्यालयाचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
पद्मश्रीं डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे निवृती सांगळे, नारायण कहार, रोहीणी निघुते, गीताराम तांबे, भगवानराव इलग, अशोक म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, कारभारी म्हसे, भाऊसाहेब लोखंडे, संजय सातपुते, सुनिल डेंगळे आदींसह पंचक्रोशीतील गावांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आश्वी आणि पंचक्रोशीतील गावांना संगमनेर तहसिल कार्यालय मोठ्या अंतरावर असल्याने सर्व शासकीय किंवा योजनांच्या कामासाठी शेतकरी महीला विद्यार्थ्यांना संगमनेर येथे जावे लागते. नागरीकांच्या सोयीसाठी अपर तहसिल कार्यालय सुरू करण्याचे धोरण महसूल विभागाने घेतल्याचा मोठा दिलासा या भागातील ग्रामस्थांना मिळणार असल्याची भूमिका शिष्टमंडळाने प्रशासनापुढे मांडली.
मात्र अपर तहसिल कार्यालय सुरू करण्यास जाणीवपुर्वक विरोध करून एकप्रकारे या गावांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाला केवळ राजकीय भूमिकेतून विरोध केला जात असून हे कार्यालय तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन तसेच कायदेशीर लढाई करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

अपर तहसील कार्यालय वाद… आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी, प्रांताधिकार्यांना दिले निवेदन
आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाला केवळ राजकीय भूमिकेतून विरोध केला जात असून हे कार्यालय तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन तसेच कायदेशीर लढाई करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

