
संगमनेर, दि. १८ – प्रतिनिधी
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी (२० मार्च) होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार मंत्री थोरात कारखाना साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव कारखान्याने देत शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन ३०००/- रुपये ॲडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामाचा समारोप गुरुवारी सकाळी नऊ वाजता माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या हस्ते, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. अमृत उद्योग समूहासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. गळीत हंगाम सांगता समारंभासाठी सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


