
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले मेंढवण गावचे सुपुत्र हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) यांच्यावर आज (दि. २६ मार्च) संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद रामदास बढे यांचे पार्थिव आज सकाळी मेंढवण येथे आणण्यात आले. त्यानंतर लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट आणि पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद बढे यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
शहीद रामदास बढे यांचे पुत्र ऋषिकेश आणि भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, लष्कराचे मेजर आर. व्ही. राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी शहीद बढे यांना श्रद्धांजली वाहिली.

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शहीद रामदास बढे यांच्या बलिदानाविषयी गौरवोद्गार काढले. शहीद बढे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
हवालदार रामदास बढे यांनी वयाच्या २० व्या वर्षी सैन्य दलात प्रवेश केला होता. त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सेवा बजावली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.


