
नाशिक, दि. २६ मार्च –
रोजगार हमी योजनेतील देयके मंजूर करण्यासाठी २ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पोतदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. त्यांच्या नाशिक येथील घरातून २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
तक्रारदार हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करतात. त्यांची २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपयांची देयके प्रलंबित होती. ही देयके मंजूर करण्यासाठी पोतदार यांनी तक्रारदाराकडे २ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर, विभागाने सापळा रचून पोतदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

पोतदार हे नाशिक शहरातील आरटीओ कॉर्नर भागात राहतात. अटकेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरावर छापा टाकला, जिथे त्यांना २ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोतदार यांच्या विरोधात सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलिस नाईक किरण धुळे, विलास निकम आणि हवालदार संतोष गांगुर्डे यांचा पथकात समावेश होता.


