

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने तातडीने १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित वेतन मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा केवळ ५६ टक्के भागच जमा झाला होता. यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, पूर्ण वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने मंत्रालयात वित्त सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एसटी महामंडळाच्या विविध सवलतींच्या बदल्यात शासनाकडून येणे असलेले १०७६ कोटी रुपये त्वरित देण्याची मागणी केली.

मंत्री सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असून, वित्त विभागाने कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनासाठी १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याबाबत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित वेतन मंगळवारी जमा होईल.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला दौऱ्यावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांच्याशी संपर्क साधून एसटी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनासाठी १२० कोटी रुपये त्वरित देण्याचे निर्देश दिले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वित्त विभागाच्या वित्त सचिवांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सचिवांनी एसटीच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनासाठी तातडीने १२० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, अर्थ सचिवांनी महामंडळाचे ९४६ कोटी रुपये तीन टप्प्यांमध्ये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, आगामी काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला निश्चितपणे होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारचे १२० कोटी रुपये मंजूर, उर्वरित वेतन मंगळवारी जमा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वित्त विभागाच्या वित्त सचिवांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सचिवांनी एसटीच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांच्या उर्वरित वेतनासाठी तातडीने १२० कोटी रुपये देण्याचे मान्य केले. यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.

