महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ आणि १२ एप्रिलला घडलेल्या या घटनांप्रकरणी १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर व पियुष संतोष गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक, संगमनेर) हे श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष आहेत. यावर्षी ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९:०० वाजता हनुमान जयंती उत्सवात सलामीचे वादन सुरू असताना आरोपी विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर यांनी भैरवनाथ ढोलताशा पथक आणून वाजवण्यास सुरुवात केली.
यावेळी अँड. गिरीश मेंद्रे यांनी आरोपींना ही सलामी होऊ द्या, मग तुमचे वादन करा असे सांगितल्यावर आरोपींनी वाद घालत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. आरोपी विनायक गरुडकर याने योगराज कुंदनसिंग परदेशी यांच्या पोटात लाथ मारली, तर आरोपी सौरभ उमरजी याने चेतन तारे याच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अमोल क्षीरसागर याने फिर्यादी कमलाकर भालेकर यांना अरेरावी करत उद्या सकाळी तुम्ही चौकातून रथ कसा काढतात तेच बघतो अशी धमकी दिली, तर आरोपी सोनू नालकर याने मारण्याची धमकी दिली. आरोपी शेखर सोसे याने किशोर उर्फ शुभम चंद्रकांत लहामगे यांच्या डोक्यात फायटरने वार केला, जो त्यांनी चुकवल्याने खांद्याला लागला. आरोपी श्याम नालकर याने श्यामसुंदर रामेश्वर जोशी यांनाही धमकी दिली.

१२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता हनुमान जयंतीनिमित्त रथाची मिरवणूक सुरू असताना आरोपी क्रमांक विनायक गरुडकर, शुभम परदेशी, ओंकार ननवरे व मयूर जाधव यांनी वाद्य आडवे लावून मिरवणूक थांबवली आणि लोकांच्या भावना दुखावल्या. तर राहुल नेहुलकर याने वाद्य वाजवू दिल्याशिवाय रथ पुढे जाऊ देणार नाही, असे म्हटल्यावर समिती सदस्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र विनायक गरुडकर आणि त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तर मयूर जाधव याने ज्ञानेश्वर अविनाश थोरात यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता चंद्रशेखर चौकात मिरवणूक संपवून रथ परत आल्यानंतर पियुष गोडसे याने चेतन विलास तारे यांना गलोरीने मारून डोक्यात दगड मारून जखमी केले, तसेच समितीच्या विश्वस्तांना मारहाण करून धार्मिक उत्सवात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३१७/२०२५ अन्वये बी. एन. एस. कलम ११९ (१), १८९ (२), १९१ (२), १९१ (३), ११८ (१), ११५, १२५ (अ), १२६ (२), ६१ (२), ३००, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पुढील तपास करत आहेत.


