महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि खळबळजनक दावे करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. बीड पोलिसांनी आज (शुक्रवार) पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली.

कासले काल दिल्लीहून पुण्यात आले होते आणि स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
काल सायंकाळी आपण पोलिसांना शरण येणार असल्याचा व्हिडीओ कासले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
रणजित कासले यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक दावा त्यांनी केला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

काल पुण्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही तासांतच कासले यांना अटक करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला होता. मतदानाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते आणि ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी हे पैसे देण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी यावेळी त्यांचे बँक स्टेटमेंटही दाखवले होते.
रणजित कासले यांच्या अटकेमुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस आता त्यांच्या आरोपांची आणि दाव्यांची कसून चौकशी करणार आहेत.


