
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे
हडपसर येथे एका तरुणाने पत्नीचे अनैतिक संबंध आणि व्याजाच्या पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि सावकाराला अटक केली आहे.
गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री हडपसरमधील सिद्धिविनायक विहारातील एका इमारतीत ही घटना घडली. सचिन सतीश गिरी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी (वय ३०) आणि रवींद्र मारुती मेमाणे (वय ४५) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिनची बहीण सविता संतोष भारती (वय ३९) यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. कोमलचे रवींद्र मेमाणे याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. दरम्यान, सचिनने रवींद्रकडून काही पैसे व्याजाने घेतले होते. रवींद्र वारंवार पैशांची मागणी करत असल्याने सचिनला मानसिक त्रास झाला होता. पत्नीचे अनैतिक संबंध आणि सावकाराच्या जाचाला कंटाटून सचिनने आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


