
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रविवारी मध्यरात्री एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. किसन दादा शिंदे (वय ३८, रा. भेंडा, नेवासा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन शिंदे यांचे त्यांच्या नातेवाईकांशी भूखंडावरून वाद सुरू आहेत. यासंदर्भात शासकीय कार्यालयातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निराश झालेल्या शिंदे यांनी रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ ही बाब हेरली आणि शिंदे यांना पकडले. त्यामुळे पुढील धोका टळला. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिंदे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, पोलीस अंमलदार रवींद्र टकले या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


