महाराष्ट्र संवाद न्यूज – लोणी (अहिल्यानगर)
लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्रीनिर्मळ गावात रविवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ५:४५ ते रात्री १०:१५ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली.

या घटनेत चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ, फ्रीज, टीव्ही आणि होम थिएटर यांचा समावेश आहे. चोरट्यांनी घरातील सामानाची तोडफोड देखील केली आणि घराबाहेर लावलेली स्कुटी गाडीचेही नुकसान केले.

या प्रकरणी किरण उर्फ करण विलास कोळगे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी करत आहेत.


