
महाराष्ट्र संवाद न्यूज –
पुण्यात एका पोलीस उपनिरीक्षकाने एका २८ वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला, मात्र पाच वर्षांनंतर तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखतून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले त्यानंतर दोघांनी नोंदणी विवाह केला होता. मात्र, त्याने हा विवाह कुटुंबीय आणि मित्रपरिवारापासून लपवून ठेवला. तसेच, समाजातही तिला पत्नी म्हणून ओळख दिली नाही.

आरोपीने ‘घरी लग्नाबद्दल सांगतो’ असा विश्वास तरुणीला दिला आणि तिच्याकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. या दरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध आले आणि तरुणी गर्भवती राहिली. मात्र, आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले.
दरम्यान, आरोपीने तरुणीला पत्नी म्हणून स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी फलटण येथील गोखली (फलटण) गावातील विराज गावडे या ३२ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


