
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे
“काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा,” असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना दिला. भाजपच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तरी तुमचा आधी विचार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मंत्री दोन दिवस वेळ देतील. तुम्ही घाबरू नका.” ते पुढे म्हणाले, “संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सर्वस्व दिले, तरी त्यांना पक्ष सोडावा लागला.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. काँग्रेसला कोणतेही धोरण नाही. जो-जो काँग्रेस किंवा इतर पक्षातून आमच्याकडे येईल, त्याचे स्वागत आहे. तुम्ही थकून जाल, इतके लोक आमच्याकडे येत आहेत.”
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या “पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब आहे,” या विधानावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “अब्दुल्ला यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. या देशातील लोक हे विधान स्वीकारणार नाहीत. पाकिस्तानचा बदला मोदी घेतील. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे.”


