
महाराष्ट्र संवाद न्यूज –
राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली.
मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि किरण त्यांच्या शेतात खत टाकत होते. खत टाकून झाल्यावर दोघेही जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेले. अचानक दोघांचाही पाय घसरला आणि ते पाण्यात पडले.

यावेळी काही महिलांनी त्यांना पाण्यात पडताना पाहून मोठ्याने आरडाओरड केली. आवाज ऐकून किसन तनपुरे तातडीने ओढ्याकडे धावले. मात्र, ओढ्यात पाणी जास्त असल्याने ते पाण्यात बुडणाऱ्या मुलांना वाचवू शकले नाही. त्यांनी दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेला बोलावले.
तत्काळ रुग्णवाहिकेतून दोघांनाही उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे गोगलगावात शोककळा पसरली असून, बुधवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. किसन तनपुरे यांच्या माहितीनुसार लोणी पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.


