
संगमनेर-अकोले (प्रतिनिधी)
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र, शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबीयांचे राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (२९ मे २०२५) सांत्वन केले. यावेळी त्यांनी या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील, असे गौरवोद्गार काढले.
ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याप्रसंगी वीरपत्नी रूपाली गायकर, शहीद जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर, तसेच विक्रम नवले, सुरेश गडाख, ॲड. आर. बी. हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर, भारत आरोटे, संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना १५ मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेले संदीप गायकर यांना वीरगती प्राप्त झाली होती. हे वृत्त समजताच बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त केला होता आणि देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या या बलिदानाचे मोल मोठे असून ते व्यर्थ जाणार नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या बलिदानाचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान राहील, असे गौरवद्गार त्यांनी काढले होते.
आजच्या भेटीदरम्यान, थोरात यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत अहिल्यानगर जिल्हा, संगमनेर तालुका आणि अकोले तालुका सदैव या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहील, असे आश्वासन दिले. वीर जवान संदीप याचा आपल्याला सदैव अभिमान राहील, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

