
संगमनेर, प्रतिनिधी
सकल धनगर समाजाच्या वतीने सुकेवाडी-खांजापूर गावात यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात साजरी झाली असली तरी, यावर्षी जयंतीला 300 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गावातील तरुणांनी एकत्र येत एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमामागे समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना उत्सवात सहभागी करून घेण्याचा आणि त्यांना अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश होता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर खर्च न करता, राजकारण विरहित जयंती साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला.

जयंतीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत समाजरत्न पुरस्कार प्राप्त ह.भ.प. शरद महाराज ढवळे यांचे जाहीर हरिपाठ कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनात तरुणांना विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा, आई-वडिलांची सेवा करण्याचा, समाजात एकजुटीने राहण्याचा, भांडणे टाळण्याचा आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा सल्ला दिला. तसेच, आपापसातील वाद-विवाद विसरून एकत्र येण्याचे आणि इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, नुकतेच आयपीएस झालेले बिरु ढोणे यांचे उदाहरण देत, समाजातील शिकलेल्या मुलांनी इतरांना मार्गदर्शन करावे असे सांगितले.
या कीर्तन श्रवणाचा जवळपास 800 ते 900 लोकांनी आनंद घेतला. कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. डीजे आणि इतर खर्चांना फाटा देऊन अध्यात्म, समाजसेवा आणि एकोप्याचा संदेश देणारी ही जयंती खऱ्या अर्थाने अनुकरणीय ठरली आहे.

