संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर शहरातील राहाणेमळा परिसरात असलेल्या हॉटेल सुरजच्या व्यवस्थापकाला चॉपरचा धाक दाखवून गल्ल्यातील सुमारे साडेअकरा हजाराची रोख रक्कम लांबविण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुणांनी हा प्रकार केला असून त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये गुन्हेगारी वाढीस लागले असल्याने वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाल्याचे दिसत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी असलेले धीरज राजेंद्र पावडे, अक्षय रामा भुजबळ आणि शुभम दिवे या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास राहाणे मळा येथील हॉटेल सूरजमध्ये प्रवेश केला. पावडे याने हॉटेलचे व्यवस्थापक हरीश थोरात यांना चॉपरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. कोणतीही दयामाया न दाखवता, हॉटेल व्यवस्थापकाच्या गल्ल्यातील तब्बल साडेअकरा हजार रुपये लुटले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे राहाणेमळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे असुरक्षित झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या आरोपींच्या सततच्या त्रासामुळे आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक हरीश थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


