संगमनेर / छत्रपती संभाजीनगर –
श्रीमंत घरच्या मुलांची ‘स्थळं’ शोधून त्यांना लग्न करून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला बीडच्या वडवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी संगमनेरच्या तीन महिलांसह कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक बनावट नवरी असून, त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन आणि एकाच नावाचे विविध आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभवी शेटे (बनावट नवरी), मनीषा ननावरे (नवरीची मैत्रीण), रणजीत अहिरे (कारचालक, तिघेही रा. संगमनेर) आणि यमुनाबाई (मध्यस्थी) यांचा समावेश आहे.
या टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या अनेक गरीब, सर्वसाधारण तसेच प्रतिष्ठित कुटुंबांचा शोध घ्यायचा. लग्न होत नसलेल्या तरुणांना सुंदर मुलगी दाखवायची. त्यानंतर तिच्या आईला कर्करोग झाला आहे किंवा तिला आई-वडील नाहीत आणि इतर काही आर्थिक अडचण सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि पसार व्हायचे. जर त्यांना पळून जाणे शक्य झाले नाही, तर त्याच कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊन खोटी तक्रार दाखल करायची. तक्रार मागे घेण्यासाठी तडजोड करून पुन्हा नवीन ग्राहक शोधणे, अशी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत होती, असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील महिला रणजीत अहिरेच्या चारचाकी वाहनाचा वापर मुलगी दाखवण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करत असल्याचे तपासात समोर आले.
अशी उघडकीस आली फसवणूक: ३ जून रोजी मनीषा नरेंद्र ननावरे (वय २५) ही तिची मैत्रीण वैभवी राम शेटे हिला घेऊन वडवणी पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या मैत्रिणीला तिच्या घरच्यांनी डांबून ठेवले होते आणि तिने तिला सोडवले आहे. सुरुवातीला वडवणीच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी महिला अधिकारी या नात्याने वैभवी आणि मनीषा यांची चौकशी केली. तसेच सोडवणूक करणाऱ्या चालकालाही बोलावून घेतले. या तिघांची स्वतंत्र चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मनीषाचे दोन दिवसांपूर्वीच वडवणी तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणाशी लग्न झाले होते. त्यांनी लग्नासाठी मुली मिळत नाहीत, या सबबीखाली मनीषाच्या मावशीला आणि तिच्या काकाला आजारासाठी तीन लाख रुपये रोख दिले होते, असे आढळून आले. तसेच मनीषाकडे वेगवेगळे आधारकार्ड असून, तिचे काका व मावशीही बनावट असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास करत या टोळीला गजाआड केले.

लग्नासाठी श्रीमंत ‘स्थळं’ शोधून फसवणारी चौघांची टोळी गजाआड, संगमनेरच्या तीन महिलांसह कार चालकाचा समावेश
तिघांची स्वतंत्र चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

